अध्याय १० – कपडे खरेदी -१५

पूर्वीच्या काळी लग्नाची कपडे खरेदी हा एक प्रमुख आणि मोठा कार्यक्रम असायचा. वधु पक्ष आणि वर पक्षातील सर्व आप्तेष्टांना त्यासाठी निमंत्रण असायचे. दोन्ही पक्षाकडून २० ते २५ जवळचे आप्त मिळून अगोदर सुनिश्चित केलेल्या कापड दुकानात जायचे. हे कापड दुकान शक्यतो वर अथवा वधु पक्षाच्या गावातील किंवा गावाजवळील असायचे. त्या पक्षाकडे अगोदर सर्व पाहुणे मंडळी एकत्र जमायचे आणि तेथून सर्व मिळून दुकानात जायचे. दुकानादारातर्फे सर्व पाहुणे मंडळीस चहा पाण्याची व्यवस्था असायची आणि एकत्र एका बैठकीत वधु आणि वरासाठीचे कपडे खरेदी केले जायचे. त्याचबरोबर आहेर आणि आप्तेष्टांना देण्यासाठीचे कपडे सुद्धा तेव्हाच खरेदी केले जायचे. ह्या खरेदीस बस्ता असे संबोधले जायचे. खरेदीनंतर दुकानाजवळ असलेल्या पक्षाकाराकडे सर्वासाठी जंगी जेवणाचा बेत असायचा. त्याचा खर्च  २/३ वधु पक्षाकडूनव १/३ वर पक्षाकडून अशी विभागणी असायची.  

मात्र कालपरत्वे ही प्रथा गैरसोईची वाटायला लागली. कारण बदलत्या परिस्थिनुसार नातेवाईक मंडळीस ह्या कार्यक्रमास हजर राहणे कठीण होऊ लागले आणि त्यामुळे वधु आणि वर पक्षांनी आपापली खरेदी स्वतः च्या सोयीसवडीनुसार करणे पसंत केले.

ह्या कपडे खरेदीत वधूसाठी हळदीच्या समारंभाची  साडी (पिवळा रंग एमब्रायाडरीची), महावस्त्र शालू, पैठणी, लग्न लागलेवर नेसावयाची साडी (सदाबहार फुल मोतीवर्क), शिवाय काही जास्तीच्या साड्या, वराचे आई आणि आजीसाठी साड्या, वधूचे आई आणि आजीसाठी साड्या तसेच दोन्ही घरच्या जाऊ आणि सुना यांचेसाठी साड्या, दोन्ही पक्षाकडील आत्या, मावश्या, माम्या, वाहिनी, बहिणी, पुतण्या, तसेच काकू यांना साड्या, सर्व साड्या साठी सुयोग्य ब्लाउज साठीचे कापड यांचा अंतर्भाव असायचा. वरासाठी शर्ट कमीतकमी ३ ते ४ नग, प्यांट कमीतकमी ३ ते ४ नग आणि १ कोटाचे / सफारीचे कापड / कोट / सफारी / शेरवानी / जँकेट / झब्बा कुर्ता अशी खरेदी असायची. वरपिता, वधूपिता, दोन्ही पक्षाचे आजोबा, काका, मामा, भाऊ, पुतणे तसेच  वधूच्या भावासाठी कपडे (सुक्याचे कपडे) हे सुद्धा खरेदी केले जातात. वर आणि वधु साठीचे अंतर्वस्त्र, रुमाल, टॉवेल, वरासाठी उपरणे, टोपी, (व्याही, जावई, पाहुणे मंडळी यांना सन्मानित करणेसाठी) उपरणे व टोप्या जास्तीच्या घेवून ठेवाव्या. हल्ली वरासाठीचे बहुतेक कपडे हे तयार शिवलेले घेतले जातात. वधु सुद्धा काही प्रमाणात आधुनिक प्रकारचे तयार ड्रेस पसंत करतात.

वधु साठीचे दागिने आधीपासून तयार नसल्यास ते वर आणि वधु यांच्या पसंतीनुसार खरेदी केले जावेत. विवाह समारंभातील वधूसाठी आवश्यक आणि महत्वाचा सुवर्णालंकार म्हणजे मंगळसूत्र. त्यास डोरले, गलेसर किंवा गंथन असेसुद्धा संबोधले जाते. शास्त्रानुसार मंगळसूत्रात तीन पदर व अठरा मणी असावेत. तसेंच मंगळसूत्र वधूच्या हृदयापर्यंत येईल इतक्या लांबीचे असावे. तीन मजबूत तंतू मध्ये उडदाच्या आकाराचे ३६० काळे मणी, अठरा सुवर्ण मणी व दोन सुवर्ण वाट्या मिळून मंगळसूत्र तयार होते. मंगल्सुत्रातील तीन पदर हे ब्रम्हा, विष्णू, महेश यांचे प्रतिक असतात; ३६० काळे मणी हे ३६० दिवसांचे; १२ सुवर्ण मणी हे १२ महिन्यांचे; ६ सुवर्न्मानी हे ६ ॠतुचे आणि दोन सुवर्ण वाट्या ह्या पती व पत्नी यांच्या द्योतक असतात. प्रचलित प्रथेनुसार मंगळसूत्रास दोन पदर आणि बारा सुवर्ण मणी व दोन सुवर्ण वाट्या असतात. व्कॅधुसाठी आवश्यक इतर दागिन्यात पायातील जोडावे, पैजण, कर्णफुले व सुवर्णमुद्रिका हि असतात. वरासाठी अंगठी, चैन, वराच्या आई व बहिनिसाठीचे अंगठी / चैन ई. ही सुवर्णालंकार खरेदी खात्रीच्या पेढीतून करावी व सर्व खरेदीची पावती घ्यावी.

लग्न खरेदीत वरासाठी बूट आणि वधूसाठी चपला खरेदी, वरासाठी टाँयपिन, वधूसाठी सौंदर्य वर्धक लग्न समारंभासाठीचे नकली दागिने / ज्वेलरी ई.चा अंतर्भाव असतो आणि त्याची खरेदी स्वतंत्र रित्या केली जाते अथवा काही वस्तू / ज्वेलरी / दागिने / बाशिंग जोड हे भाड्याने आणले जातात.

मुलीच्या लग्न प्रसंगी मोठी पितळी समई, मोठे स्टील परात, स्टील ताट, स्टील तांब्या व फुलपात्र, तांब्याची कळशी हि पाच भांडी घ्यावी मात्र त्यावर काहीही नाव टाकू नये. तांब्याचे मध्यम आकाराचे संध्यापात्र, तांब्याचा तांब्या, मध्यम आकाराची तांब्याची पळी, तांब्याचे छोटे गंगाळे, गणपती मूर्ती व अन्नपूर्णा प्रतिमा ह्या देवतांच्या १” उंचीपेक्षा जास्त परंतु फार मोठ्या नसतील अश्या अखंड (भंगलेल्या / खड्डा पडलेल्या नको)  मुर्त्या घ्याव्या. त्याचबरोबर मुलीच्या संसारास आवश्यक भांडी ठरावात ठरलेप्रमाणे खरेदी करावीत. हल्ली अशी संसारोपयोगी भांडी खरेदी लग्नानंतर नवरामुलगा ज्या गावी राहत असेल तिथे जावून त्यांचे सोई व गरजेनुसार आणि ठरवत ठरलेल्या किमतीपर्यंत असे आंदण खरेदी केले जाते.

आधीपासून येणारे पै पाहुणे तसेंच कार्यातील जेवणावळीसाठी आवश्यक किराणा सामान यादी करून १५ / २० दिवस आधीपासून खरेदी करावीत व आवश्यक ते निवड, दळण तयार ठेवावे.

लग्न दिवसाच्या ८ ते १० दिवस आधी तुरीच्या काड्या (तुरखाट्या) पाण्यात भिजत ठेवाव्यात म्हणजे लग्न दिवसापर्यंत त्या नरम होतील व त्यापासून तोरण ताटी विणता येईल. तोरण ताटी हि वर / वधु यांच्या मामाची जबाबदारी असते.

लग्न कार्यासाठी आवश्यक हार श्रीमंतीवर नवरादेवासाठी हार व गुच्छ, महाराजा व्ही आय पी स्पेशल हार ३ नग (पैकी दोन लग्न लागायचे वेळी स्टेजवर असावेत),  गुच्छ, गुलाबाची फुले (सर्व पाहुण्यांना प्रवेश वेळी देण्यासाठी), पुजेसाठीची फुले (१ ते २ किलो गुलाब पाकळ्या), फुलांची जाळी दोन नग, गजरे, तुळस पाने, मंजिरी, विड्याची पाने, समिधा, पूजा साहित्य ह्या सर्वांची यादी करून त्या त्या वस्तू लग्न दिवसाच्या आदल्या दिवशी आपल्या ताब्यात असतील अशी व्यवस्था करावी.

आपल्या कार्यास वाजंत्री हवी असल्यास अगोदर कार्यालयात चौकशी करा. बऱ्याच कार्यालयात वाजंत्री वर बंदी आहे. आपल्या कार्यालयात परवानगी असल्यास आणि आपणास वाजंत्री हवी असल्यास त्यांचे आधी अग्रिम रक्कम देवून बुकिंग करावे. तसेच घोडा अथवा मिरवणुकीसाठीची बग्गी / वरास उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून छत्री व छत्रीधारी, शोभेची दारू अर्थात फटाके यासाठी सुद्धा आधी बुकिंग करावे. प्रचलित रूढीनुसार वाजंत्री हि वर पक्षाकडून केलेली असतात.

मंडप पुरवठादार, सजावटकार, आचारी, वाढपी, वधूसाठी सौंदर्य वृद्धी कलाकार (ब्युटिशिअन), मेहंदी कलाकार, बांगड्या पुरवठादार, कुंभार, गुरुजी, छायाचित्रकार, चलचीत्रकार (व्हिदिओ शुटींग), वाहतूक कॉन्त्रक्टार, मिठाई पुरवठादार (वधु पक्षाने याकडून लाडू व फरसाण याच्या आवश्यक तेव्हढ्या पुड्या करून घ्याव्ह्यात), अक्षता व मुखवास पुरवठादार, वर आणि वधु पक्षांचा नामोल्लेख असलेली आभार कार्ड छापून मुखवास व अक्षता पुडी त्यास जोडून ठेवावी,  पाणी साठवण व्यवस्था पुरवठादार आदि सर्वांशी संपर्क साधून त्यांना आवश्यक ती अग्रिम रक्कम देवून बुकिंग करावी. काही व्यक्ती अजूनही बाजारच्या मिठाई ऐवजी घरची मिठाई (लाडू, शेव वगैरे) यास प्राधान्य देतात. आपणास शक्य असल्यास ते उत्तमच आहे. पूर्वीच्या काळी वर आणि वऱ्हाडी यांच्यासाठीची वाहन व्यवस्था वधु पक्ष करीत असे, मात्र हल्ली दोन्ही पक्ष सामंजस्याने ठरवून हि व्यवस्था करतात.

वरील सर्व कामे कुटुंबातील विश्वासू व्यक्तींना एकेकास एकेक जबादारी देवून वाटून घेतल्यास काम शिस्तबद्ध रीतीने व बिनचूक होते.

लग्न मंडपात आवश्यक बहुतेक वस्तू आणणे आणि तयारी करणे हि जबाबदारी मुख्यत्वेकरून वधु पक्षाकडे असते. अपवादात्मक वेळी विवाह स्थळी वधु पक्ष नवखा असल्यास (वर पक्षाने सुचविलेल्या ठिकाणी विवाह सोहळा पर पाडत असल्यास) वर पक्ष हि जबाबदारी पत्करतो.