अध्याय ३ – जोडीदार निवडतांना कोणत्या बाबींना महत्व द्यावे. - ८

सर्वसाधारणपणे आपल्या मुलीसाठी पालक संभाव्य जोडीदाराची नोकरी, पगार, शिक्षण, वयातील अंतर, स्वतः चे घर आहे किंवा नाही, शेती आहे किंवा नाही, गुण मेलन, गोत्र, मुलाच्या आई वडिलांची आर्थिक स्थिती, ते मुलावर अवलंबून आहेत काय?, बहिणीचे लग्न व्हायचे आहे काय? ई. बाबींना महत्व देतात. मुलींच्या पालकांची अपेक्षा असते की आपल्या मुलीला काहीही न करता सर्वकाही मिळावे. व्यावसायिक अथवा संपन्न / सधन शेतकरी असे जोडीदार मुलीना अथवा तिच्या पालकांना नकोच असतात. त्यामुळे गरीब शेतकरी मुलांना जोडीदार मिळणे केवळ अशक्यच झाले आहे.

विवाहेच्छू मुले आणि त्यांचे पालक संभाव्य जोडीदार निवडतांना मुलीचे शिक्षण, वयातील अंतर, गुण मेलन, उंची, रंग, अंगकाठी, गोत्र, मुलीची नोकरी, तिच्या आई वडिलांची आर्थिक परिस्थिती, क्वचित प्रसंगी हुंडा देणेची क्षमता, विवाह सोहळा थाटात करून देणेची क्षमता ई. बाबींना महत्व देतात.

विवाह हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळे कोणी काय करावे हे अधिकाराने सांगणे संयुक्तिक होणार नाही. मात्र आपण कुठे कमी पडतोय अथवा चुकतोय त्याबाबत मार्गदर्शन करायला काहीच हरकत नसावी. आणि म्हणूनच आम्ही सुचवू इच्छितो की -

वरील बाबीवरून काही गोष्ठी अधोरेखित होतात त्या पुढील प्रमाणे – समाज आव्हान स्वीकारायला सक्षम नाही अथवा आव्हानात्मक परिस्थितीचे फायदे समजून घेण्याइतपत प्रगल्भ नाही. विशेषतः मुलींना स्वतःच्या कर्तृत्वाची जाण नाही किंवा त्यांचा स्वतः वर विश्वास नाही.असेही म्हणता येईल की समाज मुलीवर सुयोग्य संस्कार करू शकला नाही. समाज व्यक्तीच्या बाह्य रुपास, स्वतः अनभिज्ञ असलेल्या गोत्र आणि गुणमेलन यासारख्या बाबीस अनावश्यक तेवेढे महत्व देत आहे. सगोत्र विवाह आपल्या संस्कुतीत वर्ज्य आहेच. मात्र आपले गोत्र नक्की कोणते हे कुणीही खात्रीपूर्वक सांगू शकत नाही अशी परिस्थिती असताना गोत्रास किती महत्व द्यावे हे ज्याचे त्यानेच ठरविणे योग्य होईल. आपल्या मुलीसाठी सुस्थितील, मोठ्या शहरातील नोकरशहा मुलगाच हवा ह्या आग्रहामुळे मुलींच्या कर्तबगारीस आपण दडपून टाकत आहोत. त्यांच्या क्रीयाशिलतेस आपण मारून टाकत आहोत, त्यांना जीवनात बहरण्यापासून वंचित करीत आहोत. त्यांच्या शिक्षण संगोपनास केलेला खर्च अनाठाई वाया घालावीत आहोत ही बाब मुली आणि त्यांचे पालक पूर्णपणे विसरले आहेत. मुलीच्या कर्तृत्वापेक्षा बाह्यांगाला महत्व देवून मुले आणि त्यांचे पालक आपला कर्मदरीद्रीपणा दाखवून देत आहेत. आपला पती अथवा आपला जावई उत्तम प्रकारचा नोकर पेशाचा असावा असा आग्रह धरून आपण आपल्या पुढील पिढ्यांना गुलामगिरीचे जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करतोय. आम्ही आपणास कळकळीची विनंती करू इच्छितो की कृपया जागे व्हा. सारासार विचार करा. येणारी प्रत्येक पिढी मागील पिढीपेक्षा जास्त हुशार आणि कर्तृत्ववान निपजतेय, मात्र आपण तिला योग्य ते वातावरण उपलब्ध करून देण्यात कमी पडत आहोत. शहरी जीवनाच्या मागे धावून आपण खेडी ओस पाडत आहोत त्याचबरोबर निसर्गाचे संतुलन बिघडवत आहोत आणि सुकर म्हणून आपण निवडलेले शहरी जीवन जगणे असह्य होवू पाहत आहे. आज जिद्दीने ठरविल्यास खेड्यात राहून सुद्धा युवकांना आपला विकास करता येवू शकतो आणि समृद्द जीवन जगता येवू शकेल इतपत सुविधा आणि संधी उपलब्ध आहेत. गरज आहे ती समाजाच्या साथीची आणि प्रोत्साहनाची.

आपला जोडीदार आपले वय, उंची, शिक्षण ह्या बाबत सुयोग्य असावा हि अपेक्षा असणे स्वाभाविक आहे आणि ते योग्य सुद्धा आहे. मात्र काही मुले आणि त्यांचे पालक आपली भावी जोडीदार आपल्यापेक्षा जास्त शिकलेली किंवा जास्त पगार असलेली नको कारण ती डोईजड होईल असे समजतात. यामागे स्त्रियांनी पुरुषापेक्षा वरचढ होवू नये हा पुरुषी अहंकार दिसून येतो. किंवा स्त्रीस एका कोंदणात जखडून ठेवण्याची वृत्ती दिसून येते. तसेच काही पालक भाऊ नसलेली मुलगी निवंशाची म्हणून नाकारतात. मात्र हे आजच्या परिस्थितीस संयुक्तिक नाही. याचप्रमाणे मुलीसुद्धा आपला भावी जोडीदार आपल्यापेक्षा जास्त शिकलेलाच असावा, त्यास आपल्यापेक्षा जास्त पगार असावा अश्या अपेक्षा करताना दिसतात.  ह्यामागे त्यांचेवर पुरुषांचे श्रेष्ठत्वाचे संस्कारांचा पगडा कारणीभूत असतो. ह्यात बदल होण्याची नितांत गरज आहे. स्त्री आणि पुरुष यांनी समपातळीवर एकमेकांचे पूरक म्हणून आयुष्य व्यतीत केल्यास ते जास्त सुखकारक व चिरस्थाई होवू शकेल. हल्ली बहुतेक मुलींना गलेलठ्ठ पगाराचा जोडीदार हवा असतो, त्याच्या वाडवाडिलांचा जमीन जुमला घर आदि हवे असते मात्र त्याचे आई वडील नको असतात हे कोत्या संस्कुतीचे लक्षण म्हणावे लागेल.

विवाह हा आयुष्यातील अति महत्वाचा संस्कार. त्यात आयुष्याला कलाटणी देणेची क्षमता आहे. विवाह म्हणजे फक्त युवक आणि युवती यांच्या मिलनापुरता मर्यादित संस्कार नसून त्यामुळे दोन कुटुंबांचे मिलन होत असते. एकत्र येवू घातलेल्या ह्या दोन्ही कुटुंबांचे सामाजिक स्तर, राहणीमान स्तर आणि आर्थिक स्तर समकक्ष असल्यास नवदाम्पत्याच्या आयुष्यास सकारात्मक बदलाची शक्यता जास्त असते आणि नकारात्मक बदल नगण्य प्रमाणात घडू शकतात. आणि म्हणूनच जोडीदार निवडतांना भावी जोडीदाराचा कौटुंबिक स्तर थोड्याफार फरकाने आपल्या स्तराशी समकक्ष असणे फायद्याचे ठरते. तथापि जर वधु / वर सद्गुणी, चारित्र्य सापांना, उच्च शिक्षित, सुलक्षणी व होतकरू असल्यास त्यांच्या वडिलांच्या आर्थिक व सामाजिक स्थराचा विचार न करता केलेला विवाह सुद्धा शुभकारक होऊ शकतो.

काही पालक मुलास अथवा मुलीस मंगळ आहे किंवा एक नाडी दोष आहे अथवा एक रक्तगट आहे असे एक न अनेक बाबत आडकाठी निर्माण करतात आम्ही असे सुचवू इच्छितो की कुणाचेही वैवाहिक जीवन हे त्या दाम्पत्याने केलेल्या समंजस आणि डोळस तडजोडीवर टिकत असते आणि बहरत असते एकमेकांना समजून घेवून तडजोड करायची तयारी ठेवल्या कुठलाही ग्रह, नाडीदोष अथवा रक्तगट आपले जीवन सफल होण्यापासून अडवू शकत नाही. त्यामुळे पत्रिका, गुणमेलन, नाडीदोष ह्या बाबींना अवास्तव महत्व देवू नये.

वधु आणि वर यांनी विवाहापूर्वी एकत्रित अथवा परस्परांशी विचार विनिमय करून व संमतीने सुयोग्य ठिकाणी वैद्यकीय तपासणी व त्याबाबतचे समुपदेशन करून घेणे इष्ट आहे. नव्हे ती काळाची गरज आहे. आपला जोडीदार निवडतांना त्याचे कुटुंबातील आरोग्य विषयक बाबी जाणून घेणे श्रेयस्कर ठरेल.

वर व्यावसाईक असल्यास त्याने प्रसंगी आपल्या व्यवसायास हातभार लावू शकेल अश्या पूरक शिक्षण घेतलेल्या मुलींनाच प्राधान्य देणे श्रेयस्कर ठरेल.

कर्तृत्ववान / महत्वाकांक्षी मुलीस नोकरदार जोडीदारापेक्षा व्यावसाईक जोडीदार जास्त संधी उपलब्ध करून देवू शकतो.