अध्याय ९ – निमंत्रण पत्रिका -१४

एकदा भावी वर आणि वधु यांचा साखरपुडा झाला म्हणजे सर्वात आधीचे काम विवाहासाठी मंगल कार्य निश्चित करणे हे होय. त्यासाठी साखरपुड्याचे वेळेस विवाह समारंभ कोणत्या गावी / शहरात करायचा हे सामोपचाराने ठरवायचे असते. तसेच ३/४ सुयोग्य मुहूर्त आणि दिवस ठरवून त्यांचा पसंतीक्रम ठरवायचा असतो व त्यानंतर त्या गावी / शहरात मंगल कार्यालयांची उपलब्धता निश्चित करून त्या कार्यालयास अग्रिम रक्कम द्यावी व त्या कार्यालयाकडून ती तारीख आपल्यासाठी निश्चित झाल्याची पावती घ्यावी.

एकदा मंगल कार्यालय आणि विवाह दिवस निश्चित झाल्यावर सर्वात प्रथम निमंत्रण पत्रिकेचा मसुदा आपले जवळचे नातेवाईक यांचेशी चर्चा करून व जोडीदार वर अथवा वधु पक्षाकडून पत्रिकेत छापली जाणारी त्यांचे संबंधीची माहिती मिळवायची व त्याप्रमाणे पत्रिकेचा मजकूर निश्चित करायचा. पत्रिकेत सर्वात प्रथम आपल्या कुलदेवतेचा व श्री गजानन प्रसन्न असा उल्लेख असावा. हल्ली पत्रिकेत आपल्या स्वर्गवासी नातेवाईकांची नावे “आशीर्वाद” ह्या कलमाखाली लिहावयाची पद्धती रूढ झाली आहे. लग्न पत्रिकेत “आपले विनीत” या मथळ्याखाली सर्व प्रथम कुटुंबातील हयात जेष्ठ / श्र्ष्ठ व्यक्तीची नावे नमुद करावीत. त्यानंतर उर्वरित मानदार व्यक्तींची नावे लिहावीत. लग्न पत्रिकेत कुटुंबाचे जावई व वधु / वराचे मामा यांचा नामोल्लेख असावा. निमंत्रण पत्रिकेच्या बाह्य पाकिटावर कार्य दिनांक, कार्य समय व कार्यस्थळ यांचा उल्लेख ठळक पणे करावा. आजकाल मानदार व्यक्तीच्या पती व पत्नी यांची नावे एकमेकासमोर घालण्याची प्रथा रूढ  झाली आहे. अश्या रूढ प्रथा सांभाळल्या जाव्या म्हणून मजकूर निश्चित करताना जवळचे व ज्येष्ठ / श्रेष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन घेणे जरुरीचे असते. आपल्या नातेवाईक, आप्तेष्ट, वर / वधूचे मित्र, कार्यालयीन सहकारी आदि मंडळीची यादी करावी (जे आपल्या विवाह सोहळ्यास निमंत्रित करायचे असे सर्व). आणि त्यापेक्षा थोड्या जास्तीच्या पत्रिका छापायला द्यावयाच्या असतात. यासाठी काही पत्रिका वाया जातील, काही गहाळ होऊ शकतील ह्या शक्यता विचारात घेवून पत्रीकेंचा आकडा निश्चित करावा. छपाई करणाऱ्याकडे विविध नमुन्याच्या कोऱ्या पत्रिका उपलब्ध असतात त्यापैकी आपण किती रक्कम पत्रिकेसाठी खर्च करू शकतो त्यानुसार त्या किंमत श्रेणीतील पत्रिका नमुना निश्चित करून त्यावर आपण ठरवलेला मजकूर छपाई करून घ्यावा.

विवाह सोहळ्यात पालक व्यक्तीसाठी सर्वात जिकिरीच काम म्हणजे निमंत्रण करणे. कारण ह्यासाठी सर्व मानपान व रूढी / परंपरा सांभाळून जवळच्या नातेवाईकांना प्रत्यक्ष घरी जावून निमंत्रण करणे गरजेचे असते अन्यथा रुसवे फुगवे होवून वाद निर्माण होऊ शकतात. पत्रिकेवर निमंत्रिताचे नाव लिहिताना ते लाल अथवा ठराविक रंगाच्या शाईनेच लिहावे असा काहीसा प्रघात आहे. मात्र त्याचे शास्त्रीय कारण कुणीही सांगू शकत नाही. तसेच काही यजमान पत्रिका देताना तीस हळदी कुंकू लावून / पूजन करून देतात. सध्या सर्वच पत्रिकांवर हळद कुंकू याचे प्रतिक म्हणून पिवळा व लाल रंगाचे निशाण पत्रिकेवर छापले जाते. लग्न पत्रिका छापून येताच कुटुंबातील सर्व व्यक्तींनी कुलदेवतेच्या दर्शनास अवश्य जावे. यथायोग्य ओटी भरून, दक्षिणा देवून, कुलदेवतेस पत्रिका देवून आमंत्रित करावे व सर्व इडा पिडा टळो, विघ्ने येवू देवू नको अशी विनंती करावी. त्यानंतर इष्टदेवताना व नंतर पुढील पत्रिका वाटप व खरेदी सुरु करावी.

निमंत्रण पत्रिकेचा नमुना पुढे देत आहोत –

वरील नमुना पत्रिकेत विवाह दिनांक व मुहूर्त वेळ द्यायची राहुल गेली आहे. चुकीची दुरुस्ती बाकी आहे.