अध्याय १ – लग्न आणि अपरिहार्यता – ६

शास्त्रानुसार देव आणि पितर यांच्या ॠणातूनमुक्त होणे हा विवाह संस्कार करणेचा उद्देश आहे.

लग्न का करायचे?

प्रचलित कायद्यानुसार मुलगी १८ वर्षे आणि मुलगा २१ वर्षे वयाचा झाल्यानंतर ते लग्न करण्यास पात्र होतात. मात्र केवळ वयात आले महणून लग्न करायचे हि भावना अजिबात नसावी. त्यासाठी आपला मुलगा अथवा मुलगी किंवा आपण स्वतः (स्वतः उमेदवार असल्यास) पुरेशे परिपक्व आहे का हे तपासले जाणे महत्वाचे आहे. आपण लग्न का करायचे? आणि करायचे असल्यास त्यानुसार येणाऱ्या जबाबदाऱ्या पेलण्यास आपण समर्थ आहोत का? ह्या बाबीचा प्रत्येक विवाहेच्छू वधु आणि वराने आणि त्याच्या पालकांनी मिळून संयुक्तपणे चर्चा करून निर्णय घेणे महत्वाचे आहे. आमच्या ह्या संकेत स्थळावरील बरीचशी माहिती त्याबाबत आपणास मार्गदर्शक ठरेल आणि विवाहाचा आपला निर्णय निश्चित झाल्यानंतर आपले कार्य सोपे, सुटसुटीत, शिस्तबद्ध आणि सर्वांग सुंदर करणेसाठी साहाय्य करेल.

लग्न – एक संस्कार

लग्न म्हणजे संस्कार, सहजीवन आणि समर्पण याचं प्रतिक आहे. लग्न करणे हे प्रचलित कायद्यानुसार बंधनकारक नाही. मात्र लग्न केल्यानंतर कालानुरूप समाज आणि संस्कृतीच्या उत्क्रांतीनुसार त्यास कायद्याचे कोंदण देण्यात आलेले आहे. आजच्या जीवनशैलीनुसार समाजात शांतता आणि स्थिरतेसाठी त्याची आवश्यकता आहेच.

लग्न म्हणजे स्त्री आणि पुरुष ह्यांच्या मिलनाचे समाजमान्य, संस्कृतीच्या धाग्यांची घट्ट विण  असलेले, निसर्गनियमानुसार परस्परांची शारीरिक भुख भागविणारे, परस्परांना, आप्तेष्टांना आणि समाजास ऐहिक सुख व समाधान देणारे एक अतूट बंधन आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. विवाहाच्या माध्यमातून आपल्या निरस आयुष्यास कटू, गोड, आश्वस्थ, रोमांचक, आव्हानात्मक, अश्या वेगवेगळ्या छटांची झालर प्राप्त होते आणि आपणास काहीतरी भव्यदिव्य / आगळेवेगळे करण्याची उर्जा मिळते.

लग्न म्हणजे स्त्री आणि पुरुष याच्या मिलनासाठीचे समाजमान्य साधन / संस्कार एवढ्यापुरते मर्यादित नाही. त्यायोगे दोन कुटुंबांचे मिलन होणे अपेक्षित असते आणि त्यातून आपला कुटुंब विस्तार, सुख दुख्खाच्या प्रसंगी परस्परास आधार देणारे जीवाभावाचे विस्तारीकरण असते. आपल्या उतारवयात एकमेकांचे जीवन सुसह्य करणेसाठी, आपल्या इच्छा अपेक्षांना भागीदार आणि बळ देणेसाठी प्रत्येकास एका जोडीदाराची आवश्यकता असते आणि लग्नामुळे ती पूर्ण होवू शकते.

मनुष्याच्या आयुष्यातील परमसुख म्हणजे आपले अपत्य. विधी आणि समाजमान्य विवाह संबंधातून जन्मलेले अपत्य आपल्या माता पित्यांचा गौरव असते. संततीसाठी मनुष्य त्याग आणि भविष्याचा वेध घेण्यास बाध्य होतो. लग्नामुळे अपत्य अर्थात संततीचा मार्ग समाजमान्य तसेच विधीमान्य व सुकर होतो.

ह्या आणि अश्या अनेक प्रेरक कारणासाठी विवाह अर्थात लग्न हे अपरिहार्य आहे. मात्र हि अपरिहार्यता एवढ्यावरच थांबत नाही. त्यासोबत इतर अनेक नकारात्मक अपरिहार्यता संलग्न आहेत.

प्रचलित पद्धती आणि संस्कारानुसार विवाहाद्वारे दोन भिन्न ठिकाणी, भिन्न परिस्थितीत, भिन्न अनुभवांची शिदोरी असलेल्या आणि भिन्न व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीचे मिलन असते आणि अर्थातच ते एकरूप होणे सहज शक्य नसते. आपल्या जोडीदाराविषयीच्या प्रत्येकाच्या काही अपेक्षा असतात आणि प्रत्यक्षातील जोडीदार त्या सर्व अपेक्षा पूर्ण करू शकेन असा मिळणे केवळ अशक्य असते. त्यासाठी प्रत्येकास आपल्या अपेक्षांना मुरड घालावीच लागते. आणि ही तडजोड फक्त विवाहापुरती मर्यादित नसते तर ती आयुष्यभर आणि सातत्याने करायची असते.

स्त्री आणि पुरुष ह्या दोन भिन्न व्यक्ती असतात आणि विधात्याच्या रचनेनुसार प्रत्येक व्यक्तीचे स्वभाव गुण भिन्न असतात. प्रत्येकाच्या अपेक्षा आणि स्वप्न यात तफावत असते. आणि म्हणूनच विवाहानंतर संसाराचा गाडा पुढे रेटताना ह्या भिन्नतेची सांगड घालताना दोघानाही परिस्थितीनुरूप स्वतःस बदलावे लागते किवा आपले म्हणणे आपल्या जोडीदारास यशस्वीपणे पटवून देण्याचे कसब मिळवावे लागते. जोडीदाराच्या भावनांचा आदर करणे व त्यास ठेच पोहचू नये यासाठी वेळोवेळी तडजोड करण्याची तयारी ठेवावी लागते.

ह्या आणि अशा अनेक तडजोडी अपरिहार्य असतात, त्या फारश्या कठीण नाहीत. उलटपक्षी त्या सहजसाध्य होऊ शकतात. थोडक्यात म्हणजे आपण आपल्या जोडीदारास त्याच्या वेगळेपणासह स्वीकारायचे असते. त्यास आपण तयार असाल तरच आणि तरच आपला विवाह यशस्वी होवू शकतो.