अध्याय २२ – विवाह विधी भाग १० – झालपुंजा व विवाह नोदणी प्रक्रिया पुर्ती -२७

बलुतेदारांना लग्नातील त्यांच्या सेवेचे मानधन देण्याच्या विधीस मांडव चुकवणे असे म्हणतात. त्यात पुजारी, न्हावी, स्वयंपाकी, गावातील देवस्थान, माळी, धोबी, घोडेवाला / बग्गीवाला, कुंभार, गावातील शाळा, यांचे रिवाजाप्रमाणे पैसे दिले जातात. हि रक्कम वर पक्ष देतो अथवा दोन्ही पक्ष मिळून सामोपचाराने देतात. मांडव चुकवण्याच्या विधीत घराण्यातील मोठ्यांना उपरणे – टोपी देवून त्यांचाही सन्मान करतात. तोलामोलाचे सोयरेपण दाखवण्यासाठी वधूच्या भावास आहेर म्हणून कपडे, सुवर्णालंकार व रोख रक्कम देण्याची प्रथा पूर्वापार पासून सुरु आहे. ते अलंकार, कपडे ह्यावेळेस द्यावेत ह्यालाच सुक्यापूजन असे म्हणतात. मांडव चुकते करणेचे नवरीस तिच्या पित्याने सुवर्णालंकार दिलेले असल्यास त्यांची नाग आणि वजनासह यादी / खरेदी पावती   वरपित्याकडे सुपूर्त करावी. वधूपित्याने त्याची एक प्रत स्वतः जवळ ठेवावी. याचप्रमाणे आंदणाची यादी वरपित्यास सुपूर्द करावी.

झालपूजन – लग्न बीदा होण्याआधी वधूस फुलांची जाळी  (वल) लावतात. त्याचवेळी झालपूजन करतात. गौर घरातील गोतापुड्या वगैरे सर्व सामान परातीत ठेवतात. त्याशिवाय परातीत पाच कणकेचे दिवे ठेवतात. तेव्हा वराकडील पाच जोडपे व वधु कडील पाच जोडपे वर वधु जवळ बसवतात. वधु त्या सर्वांची पूजा करून नमस्कार करते. तोरण ताटीला खोचलेले आंब्याचे डक्क्षे परातीत ठेवतात. आणि परतीतील सर्व पदार्थ नदीत किंवा पाण्यात विसर्जित करतात. याला झालापुजा किंवा आकताधामना म्हणतात.

आजकाल बहुतेक विवाह हे मंगल कार्यालयात होतात. त्याठिकाणी शासकीय विवाह निबंधकाचा प्रतिनिधी उपलब्ध करतात. तो विवाह नोंदणीचे सर्व कागद पत्र भरून त्यावर संबंधितांच्या सह्या घेतो. यामुळे विवाह नोंदणी सुलभ, जलद व कायदेशीर होते. विवाह नोंदणी हि कायद्याने बंधन कारक आहे. आपल्या कार्यालयात अशी सुविधा नसल्यास त्यासाठी कार्यालय व्यवस्थापनाद्वारे आग्रहाने नियोजन करून विवाह नोंदणी करून घ्यावी.