अध्याय १४ – विवाह विधी भाग २ – बेमाथन व गौरघर -१९

देवक बसण्याच्या प्रथेस बेमाथन बसवणे असे म्हणतात. घराचे ईशान्य कोनात बेमाथन स्थापन करण्याची वहिवाट आहे. कुंभाराकडून एक मोठी काळ्या मातीची घागर (माठ) आणि २० किंवा २८ मोठे मातीचे लोटे आणतात. परातीत एक एक गव्हाची कुरडई व पापड, कणकेच्या पाच आरत्या, अडीच पावशेर कणिक, मुठभर तांदूळ, मुठभर तुरडाळ, चाळीस / पन्नास शेकलेल्या पापड्या (पापड्याना सुत गुंढालतात), ४/५ गव्हाच्या पोळ्या, विडा, सुपारी, हळद कुंकू, सुताची गुंडी, थोडेसे तेल इत्यादी वस्तू (कुंभाराकडे?) नेतात. गौर घराची स्थापना शक्यतो माजघरात करतात. त्यात आंब्याच्या झाडाखालील मातीवर गव्हाच्या लहान ढिगावर उपरोक्त काळ्या मातीची घागर ठेवतात. घागरीत पाच सवाष्णी, पाच धारांनी नवीन काळशीतून  पाणी ओतून ती भरतात. गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा व कावेरी या पाच महानाद्यांचे पाणी भरल्याचे ते द्योतक आहे. घागरीवर मातीचे झाकण ठेवतात. माजघरात गौरघरात चार बाजूना गव्हाच्या लहान लहान चार ढिगावर प्रत्येकी पाच किंवा सात लोट्यांच्या उतरंडी करतात. आणि या लोट्याभोवती सुताचे सात फेरे गुंढालतात.  या चार उतरंडीला गुंढाललेल्या  सुताच्या लोट्याच्यासंचास गौराघर असे म्हणतात. गौर घराजवळ नंदादीप तेवत ठेवतात. धांड्याच्या (ज्वारीच्या कोरड्या ताटव्याची कणीसाची बाजू) सरस पाच, सात, किंवा नौ कापसाच्या वती गुंढाळून त्याच्याने नंदादीप प्रज्वलित करतात. गौर घर व बेमाथान जवळ गव्हाच्या लहान ढिगावर नाग्वेलीचे पान व त्यावर सुपारी ठेवून गणपतीची स्थापना करतात. बेमाथान बसवताना राशीनुसार ज्या जोडप्याचा वहर निघत असेल त्या जोडप्याच्या हस्ते बेमाथानची विधियुक्त पूजा करतात. पूजा विधी – वहर जोडप्याने पश्चिम दिशेस तोंड करून पाटावर बसावे. नंतर तीन वेळा केशवाय नमः, माधवाय नमः, श्रीकृष्णाय नमः असे म्हणून तीन वेळा आचमन करावे. नंतर प्राणायाम करावा. तेव्हा देश कालोच्चराचा असा मंत्र म्हणावा - श्रीमद् भगवतो महा पुरुषस्य विष्णोराज्ञाया प्रवर्त मानस्य भरतखंडे, ---- ग्रामे, वर्तमाने शालिवाहन शके --- नाम संवत्सरे, --- मासे, ---- पक्षे, ---- तिथौ, ---- वासरे, एवं गुण विशेषण विशिष्ठायाम शुभ पुण्यातिथौ;  इथपर्यंत मंत्र म्हणून देश काळ उच्चार केल्यावर संकल्प करावा तो असा – मला स्वतः ला वेद, शास्त्रे, पुराणे यांनी सांगितलेले फळ प्राप्त व्हावे म्हणून विवाहाचे अंगभूत बेमाथन स्थापना कर्म करतो, तसेच त्याचे अंग भूत गणपती पूजन करतो.   त्यानंतर खालील  भूमी स्पर्शन मंत्र म्हणून बेमाथन मांडल्याच्या जागेस स्पर्श करावा – ओम भूरसी भूमिर स्यादिति रसि विश्वधाय विश्वस्य भुवनस्य धत्री पृथिवी यच्छ पृथिवी दृह पृथिवी मा हिंसी:. नंतर जमिनीवर पाणी शिंपडावे. नंतर धन्याक्षेपण मंत्र म्हणावा तो असा ओम धन्य मसिधिमुही देवन प्राणायत्वोदनायत्वा व्यानायत्वा दीर्घामणुप्रसितिमा युषोधामदेवो व: सविदा हिराण्यापानी: प्रती गृभाण्यात्वच्छिद्रेण पाणिना चक्षुषे त्वां हीनाणाम्योसि; नंतर कलश स्थापना करावी तेव्हा पुढील मंत्र म्हणावे ओम अजिघ्नकलशमह्यात्वा विशत्विन्दवः| पुनर्ज्जानिवर्तश्वसन: सहत्रं धुक्ष्वोरुधारापयस्वती पुनर्म्मा विषताद्रयि हा मंत्र म्हणून बेमाथानास सुहासिनीकडून हाताच्या पंजाने हळदीचे पाच जागी पाच छापे द्यावे. व त्यावर कुन्कुवाचे पाच टिळे लावावे. मग त्यास फुलाची माल घालावीउदकनिक्षीपण मंत्र म्हणून बेमाथन उदकाने (पाण्याने) भरून घ्यावे.

नंतर पांढऱ्या कापडाचा पटका (दोन फुट लांब व चार इंच रुंद अशी चिंधी) हळदीने पिवळा करून त्यात नागवेलीचे पान, शेवया, हळद लावलेली ज्वारी, सुपारी, नाणे इत्यादी बांधतात (गेटू) आणि ते मठाच्या गळ्याला बांधतात. माठावर आपले देवक ठेवतात. बेमाथन च्या शेजारी सौन्दाडच्या काड्या व आंबा, पिंपळ, वड, औदुम्बर, जांभूळ, रुई, आघाडा यांचे डक्शे रोवतात.

अणेन यथाज्ञानेन यथा मिलीतो पचार द्रव्यै: कृतपूजनेन श्री गणपतीवरूणदेवता प्रीयतांणमम || हा मंत्र म्हणून नमस्कार करावा म्हणजे बेमाथान स्थापना झाली.

बेमाथान बसवण्याचा विधी वर आणि वधु अश्या दोन्ही पक्षास अनिवार्य असतो.

 

बेमाथान झाल्यावरच वरास हळद लावली जाते.  त्यानंतर लग्न विधीस सुरुवात होते.