अध्याय १५ – विवाह विधी भाग ३ – हळदीचा समारंभ - २०

वरपक्षाकडे हळद लावण्याआधी गणपती पूजन, पुण्यः वाचन, व मातृका पूजन इत्यादी अराधनात्मक विधी आटोपून विवाह संस्काराचा प्रारंभ वरास हळद लावण्याने होतो. वरास पूर्वेकडे तोंड करून चौरंगावर बसवतात. चौरंग रांगोळी काढून सुशोभित केला जातो. पाच सुहासिनिनी मंगलदायक गाणी गावून कुटलेली बारीक हळद तेलामध्ये मिसळून आंब्याच्या किंवा नागवेलीच्या पानाच्या टोकांनी वरास पायापासून मस्ताकापावेतो चढवीत लावतात. वराच्या वहिन्या, बहिणी, आई व नात्यातील स्त्रिया त्यास हळद लावतात. त्यानंतर वर नवीन पोशाख परिधान करून, बशिग बांधून पाटावर बसतो व त्यास सर्व आप्तजन ओवाळणी टाकतात. त्यासाठी पहिला मन मामा आणि मामी यांचा असतो. ह्या ओवालानीचा उद्देश वर/ वधूस नजर लागू नये व इडा पिडा टळावी असा असतो. ह्या रंगतदार कार्यक्रमात हळदीची गाणी व वाजंत्री सह वरास समारंभ पूर्वक अंघोळ घालतात.

वरास हळद लावून झाल्यावर उष्टी हळद लग्नचीठ्ठी बरोबर मुलीकडे घेऊन जातात..लग्नचीठ्ठीच्या सामानात २५० नागवेलीची पाने, पानासुपारीचे सामान, काही वाट्या खोबरे, पूजेचे साहित्य, मंगळसूत्र, खारका व सुकामेवा, नारळ, तांदूळ, शृंगार साहित्य, मसाल्याच्या काही पुड्या, पाच प्रकारची फळे, सव्वा किलो पेढे, आठ / दहा हळकुंडे व वधूसाठी साडी घेवून जातात. वधूपक्षाकडील भाऊ बंदाना मंडपात बोलावून विधिवत समंत्रक वधुपक्षाकडे वरील सामान सुपुर्द करतात.काही लेवा गण प्रदेशात यास सायकवाटी असे म्हणतात. न्हावी वधुपक्षाकडील बाऊबंदाना लग्नचिठ्ठी सोडण्यासाठी बोलावतो. वधूस हळद लावण्याआधी नारळ व पाच मुठ तांदळाने तिची समारंभ पूर्वक ओटी भरतात. नंतर वराकडील उष्टी हळद वधूस लावतात त्यासाठी वराकडील कार्यक्रमाची पुनरावृत्ती करतात. हळद लावल्यानतर मुला/ मुलीस नवरदेव आणि नवरी असे संबोधतात.

हळदीचा कार्यक्रम झाल्यावर वर आणि वधु यांचेकडे जवळच्या नातेवाईकांतर्फे आहेराचा कार्यक्रम होतो. हळद लागल्यानंतर नवरदेवास शक्यतो पिवळे वस्त्र नेसून फुलांची मुंडावळ (बशिग) बांधून व कापली मंगल टिळक करून मंडपात सुशोभित केलेल्या पाटावर बसवतात. त्याचवेळी आप्तेष्ठ (मामा, काका, शालक, जावई, सासरे वगैरे) यांच्याकडून भर आहेर (साडी, चोळी, शर्ट चे कापड, प्यांट चे कापड, उपरणे, टोपी इत्यादी) वरपक्षास दिला जातो. सर्व प्रथम महेराकडील(मामा) आहेर स्वीकारला जातो आणि त्यानंतर इतरांचे आहेर स्वीकारतात. सर्व आहेर स्वीकारल्यानंतर वरपक्षाकडून प्रती आहेर केला जातो.

वधु पक्षाकडे लग्न चिठ्ठी तील साडी नेसून वधु फुलांची मुंडावळ (बाशिंग) बांधून कपाळी मंगल टिळक लावून मंडपात सुशोभित केलेल्या पाटावर बसवतात व त्यावेळी आप्तेष्ट वरील प्रमाणे आहेर करतात व वधूपक्ष प्रती आहेर करतो.