अध्याय १६ – विवाह विधी भाग ४ – मांडव, तेलोते, जेवणावळ -२१

हळद आणि आहेराचा कार्यक्रम संपल्यानंतर तेलोते व गौर कन्या जेवणाचा कार्यक्रम घेतात. लग्न चिठ्ठी घेवून आलेल्या पाहुण्यासोबत पाच तेलोते शक्यतो जावई माणसे व पाच गवरण्या (अडचण नसलेल्या स्त्रिया) यांना प्रथम जेवू घालतात. त्यांच्या जेवणात रुचकर पदार्थ व मिष्टान्न असते. ते प्रथम जेवल्याशिवाय ग्राम जेवण देत नाहीत.

खेडेगावातून आणि पूर्वीच्या काळी विवाह सोहळे हे वर आणि वधु यांच्या घरी / अंगणात / वाड्यात होत असत. त्यावेळी तेलोते आणि गवारण्या यांच्या जेवणानंतर ग्रामजेवण होत असे / असते.

ग्रामजेवणानंतर वराची लग्नघरापासून  गावाच्या वेशीपर्यंत मिरवणूक निघायची. वाटेत गावातील सर्व देव देवता / मंदिरातून वर पान व सुपारी ठेवून कार्य निर्विघ्न पार पडावे म्हणून  आशीर्वाद मागायचे. आणि गावाच्या वेशीवर सर्व नातेवायिक, इष्टमित्र जमा होत व एकत्रितपणे एका अथवा अनेक वाहनातून वधुग्रामी जात असत. तेथे ते हनुमान मंदिरात / अथवा त्याजवळ उपलब्ध चौथरा / जागेवर थांबत असत. हनुमान मंदिर नसल्यास गावातील शाळेत वऱ्हाडी मंडळीची व्यवस्था केली जाते. पूर्वी अश्या ठिकाणास जानोसा घर असे संबोधले जाई. तिथून वधुपक्षास वरपक्ष आगमनाची सूचना देण्यात येत असे. वधुग्रामी आलेल्या सर्व वऱ्हाडी मंडळीचे वधुपक्षातर्फे स्वागत केले जाई व त्यांच्या बसण्याची व चहापानाची व्यवस्था केली जात असे.  ह्याठीकाणीच वधुपक्षातर्फे वरपूजन केले जाते त्यास सीमंत / शेवंती पूजन असे म्हटले जाते त्याचा विधी पुढील प्रकरणात दिलेला आहे. वरपुजानानंतर नवरदेव वाजत गाजत मिरवणुकीने वधुघरी / लग्नमंडपाकडे जात असे. जाताना स्थानिक देवळात पान सुपारी ठेवून कार्य निर्विघ्न पार पडावे  म्हणून आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे.

हल्ली बहुतेक सर्व विवाह हे कार्यालयात होत असतात त्यामुळे कार्यालयातून वरपक्षातील मंडळी व नवरदेव हे जवळील हनुमान मंदिरात जातात. व तेथे वरपूजन (शेवंतीवरील वरपूजन) झाल्यावर नवरदेव वाजतगाजत मिरवणुकीने कार्यालयाकडे येतो.