अध्याय १७ – विवाह विधी भाग ५ – शेवंतीवरील वरपूजन -२२

शेवंती ह्या विधीला सीमंत पूजन असेही म्हटले जाते. वरपक्षाच्या वऱ्हाडाने वधु पक्षाच्या ग्रामसीमेत प्रवेश केल्यावर सीमंत पूजन करण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे.

त्यात वधूचे आईवडील व नातलग वर पक्षाचे स्वागत करण्यास्तव मंदिरात बसलेल्या वराकडे जातात. गणपती व वरूण देवतेचे प्रतिक असलेल्या सुपारी व कलशाची पूजा करतात. विष्णुस्वरूप नवरदेवास आपली लक्ष्मिसारखि कन्या द्यावयाची असते, म्हणून वधूचे आई वडील वराची पूजा करतात. त्यास नवीन पोशाख अर्पण करतात. वराच्या बोटात अंगठी घालतात. त्यावेळी वराचे   विधियुक्त पाय धुवून  गंध, अक्षता लावून; हार तुरा, पुष्पे अर्पण करतात. त्यावेळी वधूपिता असा संकल्प करतो – करिष्यमान कन्या विवाहं गभुतं सीमन्ते वरपुजनं करिष्ये|| तदङ्गान गणपति पूजनं, वरुण पूजनं च करिष्ये.  वधूची आई वरमातेच्या पायावर पाणी घालते, आणि वरमातेचा तसेच वराकडील इतर आप्तेष्ठ महिलांचा यथास्थित ओटीभरण विधी करते. त्यावेळी नवरदेवास कपडे चढवून बाशिंग बांधतात. या विधीत मुलाचा मामा पानसुपारी देतो.

वराचे वधूगृही गमन – वराने वधूचे घरी तिला वरण्यासाठी जाणे यास वराचे वधूगृही गमन म्हणतात. वरपक्ष वाजत गाजत वधूगृही येतो, आता बँड, डीजे लावून वरास घोड्यावर अथवा बग्गीत / वाहनात बसवून मांडवात किंवा हाँल मध्ये नेतात. (वराची मिरवणूक चालू असताना वधूने सौन्दर्यवतीकडे /ब्युवटीशियनकडे जावून स्वतःस श्रुंगारीत करायचे असते. त्यामुळे वर मंडपात येण्यास खोळंबा होत नाही). त्या मिरवणुकीत वराचे मित्र, नातेवाईक, तरुण तरुणी डीजे व बॅंडच्या तालावर बेहोष होऊन नाचण्याची प्रथा सुरु झाली आहे. आमच्या मते हि कुप्रथा आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथडा येतो ध्वनी प्रदूषण वाढते व वऱ्हाडीमंडळीचा नाहक खोळंबा होतो, लग्न मुहूर्त टाळून जातो आणि  नवरदेव मंडपात मुहूर्त वेळेपूर्वी पोहचू शकत नाही. त्यामुळे हि कुप्रथा टाळणे गरजेचे आहे. नवरदेव मंडपात आल्यानंतर प्रवेश द्वारावर वधूची आई, काकू व इतर अशा पाच सुहासिनी पंचारतीने ओवाळून त्यांचे स्वागत करतात. त्यावेळेस त्या नवरदेवाचे पायावर पाणी टाकून त्यास पेढा अथवा गुळ खावू घालतात व त्यास नमस्कार करतात. ह्या वेळेस नवरीची आत्या पाच तांबे (दुरळ) घेवून उभी असते, त्यात शुभ शकून म्हणून नवरदेव पैसे टाकतो. त्यावेळेस एकीच्या हातात दागिन्यांनी सजवलेला कलश असतो. वर प्रवेश द्वारात येतो तेव्हा किंवा बोहल्यावर बसतेवेली वधूचा लहान भाऊ साडी नेसून घुंघट घेवून वरास मांडव / हाल मध्ये येण्यास अडवतो. वराने त्यास ५०० अथवा एक हजार रुपये दिल्यानंतर तो वराचा मार्ग मोकळा करतो. 

मंडपात शिरताना वऱ्हाडी आणि पाहुणे / नातेवाईक ह्या सर्वाना अक्षता, मुखवास, धन्यवाद कार्ड, व गुलाब पुष्प देतात. व त्यांच्यावर सुगंधी पाण्याचा शिडकावा करतात.

नंतर बाशिंग बांधलेली वधु येवून वरास हात धरून बोहल्यावर / स्टेजवर घेवून जाते. त्यावेळेस दोन कुमारिका दोन्ही बाजूने फुलांच्या पाकळ्या टाकून त्यांच्या मार्गावर पायघड्या घालतात. त्यावेळेस मंडपात मंगल दायी सनई वादन सुरु असते. बोहल्यावर सजवलेल्या खुर्च्यांवर वधु वरास बसविले जाते. उन्हातून मंडपात आलेल्या सर्व पै पाहुण्यांना वधु पक्षाकडील मंडळी पाणी देवून त्यांचे आदरातिथ्य करतात तसेंच सर्वाना अक्षता मिळाल्या असल्याची खात्री करतात. मिळालेल्या नसल्यास त्यांना जागेवर अक्षता दिल्या जातात.