अध्याय १८ – विवाह विधी भाग ६ – शुभ मंगल -२३

प्रारंभी नवरदेव पूर्वाभिमुख उभा राहतो त्याच्या समोर मध्यभागी कुंकवाने स्वस्तिक चिन्ह रेखांकित केलेला अंतरपाट धरण्यात येतो. वराच्या पुढ्यात अंतरपाटाच्या दुसऱ्या बाजूस नवर्या मुलीस वराकडे तोंड करून उभे करतात. तदनंतर मंगलाष्टके  म्हणावीत ती अशी -  (मंगलाष्टके सुरु असताना वधु मातेने तुळशीवर कळशीतील जलधारा सतत सोडावी व तोंडाने ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्रोत्चार करावा) (मंगलाष्टके चालू असताना वधु वरांनी आपल्या मनात कुलदेवतेचे स्मरण करत अंतरापाटावरच्या स्वस्तिकाकडे एकाग्रतेने पाहावे)

अथ विवाह मंगलाष्टकम

स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धीदम् | बल्लाळो मुरुडं विनायकमढं चिंतामणीस्थेवरम् || लेण्यान्द्रीगिरिजात्मकं सुरवदं विघ्नेश्वरं ओझरम् | ग्रामो रांजणस्थितो गणपती: कुर्यात सदा मंगलम् ||१|| वधु वर योग शुभं भवतु. “सावधान”

गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा | कावेरी शरयू महेंद्र तनया चर्माणवंती वेदिका ||   क्षिप्रा नेत्रावती महासुर नदी ख्याताच या गंडकी | पूर्णः पुर्नेजलेह समुद्र सहितः  कुर्यात सदा मंगलम || २|| वधु वर योग शुभं भवतु. “सावधान”

कस्तुरी तिलकं ललाट पटले वक्षस्तले कौस्तुभम | नासाग्रे नवमौक्तीकम करतले वेणुः करे कन्काण || सर्वागे हरिचंदन सुललीतम कंठे च मुक्तावलिः | गोपस्त्री परीवेस्टीतो विजयते कुर्यात सदा मंगलम ||३|| वधु वर योग शुभं भवतु. “सावधान”

राजाभिमक रुख्मिणीस नयनी देखोनी चिंता करी | हि कन्या सगुण वरानृपवरा कवणासी म्यां देईजे|| आतां एक विचार कृष्ण नवरा त्यासी समर्पू म्हणे| रुखामापुत्र वडील त्यासी पुसणे कुर्यात सदा मंगलम || ४ || वधु वर योग शुभं भवतु. “सावधान”

आली लग्न घटी समीप नवरा घेवोनी यावा घरा| गृह्योक्ते मधुपर्क पूजन करा अन्तःपटते धरा || दृष्टादृष्ट वधु वरा न करता दोघे करावी उभी |  वाजंत्रे  बहु गलबला न करणे,  कुर्यात  सदा  मंगलम  || ५ || वधु वर योग शुभं भवतु. “सावधान”

तदेव लग्नं सुदिनं तदेव, ताराबलं चंद्रबलं तदेव | विद्याबलं दैवबलंतदेव लक्षिपते तेंऽघ्रियुग स्मरामि ||

त्यानंतर वधु वरांनी परमेश्वराचे असे चिंतन करावे – इष्ट देवता, ग्राम देवता, कुलदेवता, चिंतन सुमुहूर्त सावधान ! लक्ष्मिनारायण चिंतन सावधान ! ब्रम्हा सावित्री चिंतन सुलग्न सावधान ! उमामहेश्वर चिंतन सुलग्न सावधान ! अति सुलग्न सावधान ! सावधान सावधान सावधान !!!

मंगलाष्टके संपताच अंतरपाट उत्तरेकडे ओढून काढून घेतात व मंगल वाद्ये वाजविली जातात. शेवटचे तीन वेळा सावधान म्हटल्यावर आमंत्रित पाहुणे वधु वरावर अक्षता रोपण करतात. प्रथम वधु हि वरास वरमाला घालते नंतर वर हा वधूस पुष्पमाला घालतो. त्यानंतर वधु वर एकमेकाचे हात एकमेकात घेतात. त्यास हातोली किंवा हातोई असे म्हणतात. त्यानंतर नवरीने नवरदेवास औक्षन करावे व त्यास नमस्कार करावा व दोघांनी एकमेकास पेढा भरवावा. अशा तऱ्हेने लग्न लागणे हा विधी संपन्न होतो.

लग्न लागल्यानंतर  वऱ्हाडी व पाहुण्यांना जेवणासाठी निमंत्रित करावे व त्यांच्या जेवणाकडे विशेष लक्ष द्यावे.

लग्न विधी संपन्न झाल्यावर नवरा नवरी यज्ञ विधीजवळ येवून पाटावर बसतात. त्यावेळेस नवरदेव नवरीस विधियुक्तपाने मंगळसूत्र बांधतो.