अध्याय १९ – विवाह विधी भाग ७ – अग्निफेरे - २४

सप्तपदी (चवरी भवरी)सप्तपदिमध्ये वराने वधूचा हात धरून होमाच्या उत्तर बाजूस केलेल्या तांदळाच्या सातही राशीवरून तिला चालवीत नेणे ह्याकृतीस सप्तपदी म्हणतात.

चवरी भवरीच्या (सप्तपदी) सामानात काही सुपाऱ्या, हळकुंडे, बदाम, खारका, सुक्या खोबऱ्याच्या वाट्या, व सुमारे सव्वा किलो तांदूळ ह्या वस्तू पुरोहिताकडे सुपूर्द करतात. चवरी  भवरीचे सामान वरपक्षाचे असते. त्यादिवशी जी तिथी येत असेल तेवढ्या सुपाऱ्या, हळकुंडे, बदाम, खारका, खोबऱ्याच्या वाट्या असतात.  हा विधी करतांना यज्ञ वेदीच्या सभोवती सात पाटावर प्रत्येकी एक अश्या तांदळाच्या लहान लहान सात राशी मांडलेल्या असतात. प्रत्येक राशीवर सुपारी ठेवलेली असते. होमाग्नी अर्ध्यदानाने प्रज्वलित केला जातो. लाह्यांचे चौथे आणि अंतिम अर्ध्यदान वधु नवरदेवाचा मंत्रोच्चार थांबल्यावर स्तब्धपणे करते. पुरोहिताचा सतत मंत्रोच्चार चालू असताना वधुवर यज्ञ वेदिभोवती प्रदक्षिणा घालतात. तसे करताना वर वधूचा हात धरून पुढे चालतो. वधु पुढे चालताना तांदळाच्या राशीवर प्रथम उजवे पाऊल ठेवून चालते प्रत्येक पदाचा स्वतंत्र मंत्र उच्चारला जातो. वधूने प्रत्येक राशीवर आपले पाऊलठेवल्याबरोबर वराने खाली दिलेला एकेक मंत्र म्हणत जावा. एका प्रदक्षिणेत एक मंत्र याप्रमाणे सात प्रदक्षिणेत सात मंत्र म्हणायचे असतात. प्रत्येक प्रदक्षिणेनन्तर वधु उजव्या पायाच्या अंगठ्याने एकएका पाटावरील सुपारी सरकवीत असते. याप्रमाणे सात प्रदक्षिणात सात मंत्र म्हणावेत व सातही पाटावरील सुपाऱ्या सरकवाव्या.  पहिले पाऊल पहिला मंत्र – हे वधु तू माझे समागमे एक पाऊल चाललीस, तेव्हा तुझे माझे सख्य झाले, म्हणून तू मला अन्न पुरवणारी हो. माझे व्रत पूर्ण करण्यास मदत कर. आपणास संतती होवून ते दीर्घायू होवोत. दुसरे पाऊल दुसरा मंत्र – हे वधु तू माझे समागमे दोन पावले चाललीस, ती तू मला बळ देणारी हो. तिसरे पाऊल तिसरा मंत्र – हे वधु तू तीन पावले चाललीस, म्हणून माझे धन वाढवणारी हो. चौथे पाऊल चौथा मंत्र – तू माझेबरोबर चार पावले चाललीस  म्हणून तू माझे सुख वाढवणारी हो. पाचवे पाऊल पाचवा मंत्र – तू माझे बरोबर पाच पावले चाललीस, म्हणून तू संतती वाढवणारी हो. सहावे पावूल सहावा मंत्र – तू माझेबरोबर सहा पावले चाललीस, म्हणून सर्व ऋतूत प्राप्त होणारे भोग देणारी हो. सातवे पाऊल सातवा मंत्र – तू माझे बरोबर सात पावले चाललीस, यामुळे तुझे माझे सख्य (नाते)दृढ झाले. यानंतर पुरोहिताने वधु वराची मस्तके एकमेकाचे मस्तकास लावून, त्यावर ईशान्येस ठेवलेल्या कलशातील उदक मस्तकावर शिमपडावे. तेव्हा शान्तिरस्तु इत्यादी मंत्र म्हणून आशीर्वाद द्यावा. नंतर वधु वरांनी पुर्वस्थळी बसून यज्ञ होम करून होम विधी आटोपावा.