अध्याय २० – विवाह विधी भाग ८ – कन्यादान -२५

कन्यादान (लाजाहोम) –

होमाग्नी प्रज्वलित केल्यानंतर लाजाहोम विधी होतो. या विधीच्या वेळी पुरोहित वधूच्या पदराची गाठ वराच्या खांद्यावरील उपरण्यास बांधतो. त्यास गाठजुळा असे संबोधतात. प्रथम  वराने पूर्वस्थानी येवून, वधूला उभे राहण्यास सांगावे. नंतर तीजकडून स्वच्छ उदकाने तिचे दोन्ही हात चांगले धुवून काढावे. मग तिला हाताची अंजली (ओंजळ) करण्यास सांगून वराने पळीने किंचित तूप घेवून ते तिच्या ओंजळीत घालावे. नंतर वधूच्या भावाने अगर त्याजागी असलेल्या मनुष्याने उभे राहून सुपातील मुठ मुठ लाह्या दोनदा कन्येच्या ओंजळीत घालाव्या.  नंतर वराने सुपातील व ओंजळीतील लाह्यावर तूप घालावे व उभे राहून आहुती मंत्र असा म्हणावा – कन्येने अर्यमा नावाच्या ज्या अग्नी देवतेला पूजले, तो आर्यमन या कन्येला पितृगृहातील पाशातून सोडवो, पतीच्या (माझ्या) पाशातून न सोडवो. असे म्हणून आपल्या दोन्ही हातानी वधूची अंजली धरून त्यातील सर्व लाह्या होमात घालाव्या. सप्तपदिनंतर वधु वर अचल अश्या ध्रुव ता-यांकडे (उत्तरेकडे) तोंड करून त्यास हात जोडून नमस्कार करतात.  सप्तपदीनंतर विवाह संस्कार पक्का व अप्रत्यावर्ती होतो.

ते जोडपे होमाग्नी, भूमाता आणि देव ब्राम्हणांना साक्षि ठेवून अशी शपथ घेते की, आयुष्याच्या अंतापर्यंत सर्व सुख दु:खामध्ये ते एकमेकांचे साथीदार राहतील. त्यानंतर अग्नी परीणयन आणि अश्मारोहण विधी पार पडतात. अग्नीपरीनायन मंत्र -  हे स्त्रिये, मी सामवेद आहे, तू ऋग्वेद आहेस, मी आकाश रूप आहे, तू पृथ्वी रूप आहेस, आपण विवाह करू आणि एकमेकावर प्रीती करू व एकविचारी वागून शंभर वर्षे जगू असे म्हणावे. नंतर वधूस दोन्ही पाय (दगडी) पाट्यावर ठेवून, उभे राहण्यास सांगावे. तेव्हा वराने अश्मारोहण मंत्र असा म्हणावा – ह्या दगडावर चढ आणि दगडासारखी स्थिर हो. जे कोणी भांडण्यास किंवा लढण्यास येतील त्यांचा प्रतिकार कर आणि त्यांना वश करून घे.

वरास वधूचे दान देणे यास कन्यादान म्हणतात. वराचे तोंड पूर्वेकडे व वधूचे तोंड पश्चिमेकडे अशी एकमेकासमोर तोंड वरून त्यांना उभे करावे. नंतर मुलीच्या वडिलांनी त्यांच्या दक्षिण बाजूस आपले पत्नी सह उत्तरदिशेस तोंड करून बसावे. नंतर आचमन व प्राणायाम करून हा मंत्र म्हणावा – मम आत्मनः वेदोक्त फलाप्राप्त्यार्थ अस्माकं सकुटूम्बानां सपरीवाराणां द्विपद चतुष्पदसहितानां क्षेमस्थैर्या भयारूरोग्यौश्वर्याभिवृद्यार्थ समस्त मंगल प्राप्त्यार्थ समस्ताभ्युद्यार्थ च श्री अमुक देवता प्रीत्यर्थ यथा मिलितोपचारद्रव्यद्याना-ऽऽवाहनादीषोडशोपचारद्रव्येः पूजां करिष्ये | तदंग असणाडी कलशध्यार्चनं च करिष्ये ||

कन्यादान संकल्प - ---- प्रवरणे युक्त, ---- गोत्र असलेला, ----- नावाचा मी, माझ्या सर्व पितरांना निरतिशय आनंद यासहीत ब्रम्ह लोकाची प्राप्ती इत्यादी कन्यादानाचे फळ प्राप्त होण्यासाठी वरापासून या कन्येच्या ठाई उत्पन्न होणाऱ्या संततीच्या योगाने बापाचे कुलामधील बारा आणि नवऱ्याचे कुलामधील बारा पिढ्यांना आणि स्वतः आपणाला (मिळून २५ पिढ्यांना) पवित्र करून, त्यांचा उद्धा करण्यासाठी आणि श्री लक्ष्मिनारायणाचि प्रीती व्हावी म्हणून ब्राम्ह्य विवाहाच्या विधीने मी कन्यादान करतो. असे म्हणून दर्भ आणि अक्षता मिश्रित उदक हाती घेवून संकल्प सोडावा. कन्यादानाचा श्लोक – हि सुस्वरूप व सुवर्णाच्या अलंकारांनी युक्त अशी कन्या ब्रम्हा लोकांची प्राप्ती करून घेण्याच्या इच्छेने आपणास विशुप्रमाणे समजून देतो. विश्वंभर परमेश्वराच्या, सर्वाभूतांच्या व देवतांच्या साक्षिने हि कन्या पितरांचा उद्धार करण्यासाठी आपणास देतो. असे म्हणावे. एक नवे कास्य पात्र ठेवून, त्यावर कन्येची ओंजळ, त्यावर वराची ओंजळ आणि त्यावर आपली ओंजळ धरावी. नंतर कन्यादानासाठी मंतरून ठेवलेले उदक पात्र आपल्या उजव्या हाताकडे असलेल्या आपल्या पत्नीच्या हातात द्यावे आणि तिचे कडून त्या पत्रातील उदक आपल्या ओंजळीवर बारीक धारेने सतत घालावे. ते असे की, ते आपल्या ओंजळीमधील पाणी, खाली कन्येच्या ओंजळीवर धरलेल्या वराच्या ओंजळीच्या उजव्या हातावर पडून, नंतर ते कन्येच्या ओंजळीतून कास्यपत्रात पडत राहावे. त्यानंतर असा मंत्र म्हणावा - ----- प्रवराचा, ------ गोत्राचा, -------- चा पणतू, ------ नातू, ------- चा पुत्र ------ नावाच्या, कन्यार्थी विशुरूपी वराला, ---- प्रवराची, ------ गोत्राची, ----- ची पणती, ------- नात, ------ कन्या, ------ नावाची, वरार्थिनी श्रीस्वरूपी प्रजापती देवतेची कन्या प्रजोत्पादन करण्यासाठी तुला मी देत आहे, ती तुझी आहे, माझी नाही. आपण कन्येचा स्वीकार करावा. असे म्हणून वराचे हातावर अक्षता व दर्भ यासह उदक घालावे.

कन्यादान आई वडील, काका काकु यांच्या हस्ते वरील विधीप्रमाणे करून आपल्या कन्येस देवाच्या मुर्त्या अर्पण कराव्यात. देव कन्येच्या ओटीमध्ये देताना खोबऱ्याच्या वाटीत तांदूळ भरून त्यावर देवाच्या मुर्त्या ठेवून मुलीच्या ओटीत जावयाच्या साक्षिने द्यावेत. तद्वतच मुलीचे आई वडील मुलीचा संसार सुकर व्हावा यासाठी संसारोपयोगी अत्यावश्यक अशी पाच भांडी नवीन जोडप्याला अर्पण करतात.

त्यानंतर सवड मिळताच वधु व वर पक्षाकडील समवयस्क मंडळी वधु वरास नाव व उखाणे घेण्यासाठी अडवतात. वधूच्या लहान बहिणी / मैत्रिणी नवरदेवाची पादत्राणे लपवितात. वराने पैसे दिल्याशिवाय पादत्राणे परत करीत नाही.