अध्याय ८ – साखरपुडा अर्थात वाङनिश्चय -१३

विवाह संस्कारातील आद्यविधी म्हणजे साखरपुडा अर्थात वाङनिश्चय / साक्षीगंध/ शालमुदी. मुला मुलीच्या पालकांनी विवाह (लग्न) जुळल्याबद्दल बोलून केलेला ठराव यालाच प्रयोगशास्त्रात वाङनिश्चय व व्यवहारात साखरपुडा / साक्षी गंध/ शालमुदी असे संबोधतात. त्याचप्रमाणे मुलगी वरास देण्याचा ठराव झाल्यानंतर त्या गोष्टीचे साक्षी साठी मुलीस जे विधियुक्त गंध / टिळा किंवा कुंकू लावतात त्यास साक्षगंध म्हणतात. त्यात मुलीस साखरेच पुडा देतात म्हणून त्यास साखरपुडा विधी म्हणतात. साक्षगंध / साखरपुडा झाल्यानंतर सोयरिक कायम केल्याचे दर्शन म्हणून मुलास शाल, दुशाल आणि अंगठी देण्याचा जो विधी करतात त्यास शालमुदी म्हणतात.

साखरपुडा, साक्षागंध व शालामुदी हे तीनही विधी एकट्या वेदोक्त वाग्दान विधीत समाविष्ट आहेत. हा कार्यक्रम वधु पित्याकडे केला जातो. त्याचा विधी खालील प्रमाणे –

आवश्यक साहित्य – चौरंग २ नग, त्यावर टाकण्यासाठी मंदरा (लाल वस्त्र), पाट २, आसन पट्टी २, ताम्हन, आचमन पळी, पंचपात्र, उदकाने (पाणी) भरलेला गडवा (ताब्या) २, अक्षता, गंध, फुले, दुर्वा, तुलसी मंजिरे व पाने, हळकुंडे ६,  हळद, कुंकू, रांगोळी, गुलाल, निरंजन, गुळ, साखर, सुपाऱ्या २०, बदाम १, खारीक १, नारळ ५, खोबऱ्याची वाटी ४, पंचामृत (दुध, दही, तूप, मध आणि साखर यांचे मिश्रण), विड्याची पाने ३०, तांदूळ, उदबत्त्या २, थोदासा उद, थोडा कापूर, स्टीलचे ताट याशिवाय तांदूळ २ किलो, गहू, खण १ माचीस,   शाल, मुदी, मुलीसाठी साडी चोळी,  अलंकार, वाटावयास हळकुंडे व सुपाऱ्या आणि वाद्ये.

पूजन

सुपाऱ्या

पाने

नारळ

गणपती पूजन

वरूण पूजन

शची पूजन

सौभाग्य वायने #

१८

 

# एका वायनामध्ये खण, फणी, करंडा, मणी, मंगळसूत्र, गालेसार, तांदूळ, नारळ सुपलीतून देतात.  दक्षिणा यथाशक्ती. याप्रमाणे सामान असावे.

पूर्व तयारी – प्रथमतः मुलाच्या बापाने (पालकाने) आपल्या अप्तामधील स्वच्छ पोशाख केलेले, चार किंवा आठ विवाहित जोडपे यांचे सोबत वाग्दान साहित्य देवून शुभ मुहूर्तावर वाजत गाजत नवरी मुलीच्या बापाचे घरी पाठवावे. त्यांनी घरून निघताना देवास नमस्कार करावा त्याप्रसंगी वर आणि कुटुंबीयांनी परमेश्वराची अशी प्रार्थना करावी – हे देवांनो आम्ही कन्या वरण्यासाठी पाठवलेले आमचे स्नेही ज्या रस्त्याने कन्येच्या वडिलाचे घरी जात आहेत ते रस्ते निष्कंटक व नित असावेत. अर्यमा आणि भाग हे दोन देव आमच्या स्नेह्यास सुखरूपपणे पोहचवोत. हे ज्या कुळातील कन्येला वरण्या करिता जात आहेत त्या कुळाचा आमच्या कुळाशी संबंध घडो. तद्वतच हे होणारे नवदाम्पत्य उत्तम प्रकारे नांदोत.

वधु पक्षाकडील मुलीच्या बापाने (पालकाने) त्यांचे उत्तम प्रकारे स्वागत करून उत्तम आसनावर पश्चिमाभिमुख बसवावे. त्यांच्या समोर कन्या पित्याने आपल्या आप्त इष्टाना बसवावे

विधीस आरंभ – प्रथमतः कन्येसाठी बिछाईतावर चौरंग किंवा पाट मांडून, त्यावर स्वच्छ वस्त्र घालून आसन तयार करावे. कन्येस शक्य ते उत्तम अलंकार (दागिने), घालून व स्वच्छ, निट नेटका पोशाख नेसवून तिला पूर्वाभिमुख बसवावे. व कन्यापित्यानेही तिचे जवळ बसावे. नंतर वराकडील मंडळीनी कन्येच्या हातामध्ये नारळ व विडा द्यावा. नंतर वर पक्षाचे मंडळीनी कन्या पक्षाचे मंडळी समक्ष पूर्वेस किंवा पश्चिमेस तोंड करून सर्वांनी किंवा एका प्रतिनिधीने गणपती पूजन व अभिष्ठ देवता आणि कुलस्वामी यांचे स्मरण करावे. व गणपती पूजन करावे. नंतर वराच्या प्रतिनिधीने ----- प्रवर युक्त, ----- गोत्रात उत्पन्न झालेला, ---- चा पणतू, ---- चा नातू, --- चा पुत्र --- नावाचा हा वर, याच्याकरिता ------ प्रवर असलेली, --- गोत्रात जन्मलेली, ---- ची पणती, --- नात, --- मुलगी, ------ नावाची हि कन्या भार्या होण्यासाठी मागत आहोत / स्वीकारत आहोत असे म्हणावे. त्यावर कन्यादान करणाऱ्याने आपली भार्या, ज्ञातीबंधू व इष्ट मित्र यांची समती घेवून, वर सांगितल्याप्रमाणे वराच्या व कन्येच्या गोत्र प्रवराचा उच्चार करून स्वीकार करा असे म्हणावे. याप्रमाणे दोन वेळा वर पक्षाने ती कन्या मागावी. व कन्यादान करणाराने देईन, देईन, देईन असे मोठ्या स्वरात तीन वेळा म्हणावे. नंतर वर पक्षाकडील मंडळीनी किंवा त्याच्या पैकी एकाने हळद, कुंकू, गंध, अक्षता, दोन साड्या चोळी, अलंकार, तांबुल, पुष्प, साखरेचा पुडा, वगैरे पदार्थ यांनी कन्येचे गंध द्वारा इत्यादी मंत्रांनी पूजन करावे ते असे – आरंभी कन्यापूजन करणाऱ्या वर पक्षाकडील मनुष्याने तांब्याचे घंगाळात मुलीचे दोन्ही पाय धुवून, ”ओम गंध द्वारां दूर धर्षा नित्य पुष्टां करिषिणीम् ईवरी  सर्व भूतानां तामिहोपव्हये श्रियं” हा मंत्र म्हणून कपाळास कुंकू व अक्षता लावाव्या. नंतर पायास हळद व कुंकू लावावे. नंतर फुलांची जाली मुलीचे डोक्यावर ठेवावी. “ओम हिरण्य रूपा. स हिरण्य सदृग पात्र पात्से दुहिरण्य वर्ण: हिराण्यायात्परियोनोनिर्षध्या हिरण्यदाददत्यत्र मस्मे” हा मंत्र म्हणून दागिने द्यावेत. नंतर “ओम युवं वस्त्राणि पीवसा थे युवोर छि द्रामंत बोहसर्मा: | अवती रतं नृतानि विश्व ॠते न मित्रा वरुणा स चे थे || हा मंत्र म्हणून साडी चोळी द्यावी. आणि मग “ओम या: फलिनी र्य्या ऽ अफला ऽ अपुश्वा  याश्च पुष्पिणी | बृहस्पति प्रसूता स्तानो मुच्चनत्वांहसः || हा मंत्र म्हणून केली, नारळादी द्यावे. तोंडात खडी साखरेचा खडा घालावा व उभे राहून दोन पैशाची ओवाळणी घालावी. पुन्हा खाली बसून, हात जोडून नमस्कार करावा म्हणजे कन्यापूजन झाले. नंतर मुलीस वस्त्रोप वस्त्रे धारण करण्यास घरात पाठवावे. नंतर कन्या पित्याने चौरंगावर पूर्वेकडे तोंड करून बसून कन्येस बोलवून, आपले डावे बाजूस बसवावे व हातात थोडेसे उदक व अक्षता घेवून, केश कालोच्चार व संकल्प करावा तो असा “श्रीमद्भागवतो महापुरुषस्य विष्णो राज्ञाया प्रवर्त मानस्य भरत वर्षे ---- ग्रामे शालिवाहन शके --- नाम संवत्सरे ------ मासे ----- पक्षे ----- तिथी ------ वासरे ------- दिवस नक्षत्रे शुभ नाम योगे शुभ करणे वर्तमाने एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्या तिथौ ||

वाग्दान संकल्प – हे माझ्या कन्येच्या पुढे करावयाच्या विवाहाचे अंगभूत असे वाग्दान मी करतो असा संकल्प करावा. आणि त्याचे अंगभूत गणपतिपूजन व कलश (वरूण) पूजन करतो असे म्हणावे. नंतर त्यास अनुसरून “गणानां त्वां” ह्या मंत्राने गणपती पूजन आणि पुण्यःवाचनातील “महीद्यो” इत्यादी मंत्रांनी कलश पूजन करावे.

वर पक्षाचे पूजन – कन्येच्या वडिलांनी आपले जागेवरून उठून आपले जागेवर वर पक्षामधील कन्या पूजन करणारास बसवून, आपण स्वतः त्याचे समोर पश्चिमेकडे तोंड करून बसावे. आणि नंतर त्याची गंदग, अक्षता, फुले, विडा इत्यादिकांनी पूजा करावी.

कन्या पक्षाचे पूजन – वर पक्षामधील मुख्य मनुष्यानेहि गंध, अक्षता, फुले, विडा वगैरेनी कन्येच्या वडिलांची त्याचप्रमाणे पूजा करावी.

कन्यादान करणाऱ्याने शिष्टाचारानुसार ५ हळकुंडे, ५ सुपाय्रा घेवून त्यावर गंध, अक्षता, फुले घालून, त्यास शोभायमान करावे.आणि ---- प्रवर असलेला, ---- गोत्रात जन्मलेला ------ पणतू, ----- नातू, ---- मुलगा, ----- नावाचा हा वर यास, ------ प्रवर असलेली, ----- गोत्रात जन्मलेली, ------ ची पणती, ------- ची नात, ----- ची “-----“ नावाची कन्या ज्योतिष्याने नेमून दिलेल्या सुमुहूर्तावर देईन; असे आता वाणीने सांगतो असे म्हणावे.

यानंतर वर व वधु यांनी एकमेकास अंगठी (सुवर्ण मुद्रिका) घालून पुरोहित व सर्व जेष्ठ श्रेष्ठांना नमस्कार करून सर्वांचे आशीर्वाद घ्यावेत. तसेच दोन्ही व्याह्यांनी एकमेकास आलिंगन देवून एकमेकास पेढा भरवावा.

प्रचलित प्रथा – सध्या प्रचलित प्रघात नुसार वरपक्षाकडून वाग्दत वधूस साखरपुड्याच्या मंगल प्रसंगी खालील वस्तू भेट तेण्याचा प्रघात आहे - सर्व शृंगार साहित्यासह सुटकेस / बँग, सुवर्ण मुद्रिका, काही दागिने (इच्छेनुसार / कुवतीनुसार). साडी व ब्लाउज, पैजण, छल्ला,पर्स, घड्याळ अथवा मोबाईल, हातरुमाल, कुंकवाची डबी, काचेच्या बांगड्या, गुलाल, हळद, कुंकू, ५ प्रकारची फळे प्रत्येकी २ नग, साखर सव्वा किलो, पेढे अर्धा किलो, नारळ, १२५ विड्याची पाने, तिथी नुसार खारीक नग, सुपारी १५ नग, बत्तासे पाव किलो, पान सुपारी साहित्य – कात डबी, नवरीसाठी मोगऱ्याच्या फुलांचे गजरे व ड्रायफ्रुटचे पाकीट.   

त्यांचप्रमाणे वधु पित्याकडून वरास सुवर्ण मुद्रिका किंवा सुवर्ण लाँकेट (चैन), पोशाख, शुभ शकून भेट देतात व वराचे बहिणीस सुवर्ण मुद्रिका (अंगठी) आणि वराकडील महिलांना साडी किंवा ब्लाउज देतात.

आजकाल साखरपुडा प्रसंगी सुद्धा विवाह विधी मंत्र म्हटले जावून वधु वर यांनी एकमेकास पुष्पहार घालण्याची प्रथा सुरु झालेली आहे. ती करावयाची असल्यास आधी दोन सुंदर पुष्पहारांची व्यवस्था करावी.

 साखरपुडा सोहळा कार्यालयात असल्यास अथवा त्यासाठी मंडप उभारलेला असल्यास त्यासमोर ------------ व ----------- परिवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे असा फलक लावावा.

वरील कार्यक्रमादरम्यान सर्वासाठी वधु पित्यातर्फे चहापान व्यवस्था असावी. तसेंच कार्यक्रम संपल्यावर चांगल्या प्रकारचे गोड धोड मिश्रित जेवणाची व्यवस्था असावी.